
मयत शिक्षक संतोष गाडे यांच्या कुटुंबाला मिळाला न्याय
शिक्षक भारतीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश….
लोकमराठी News, कुर्डूवाडी ता.14
सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टीदरम्यान कुर्डूवाडी-माढा रोडवरील ओढ्याला आलेल्या पुरामध्ये 21 सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भेंड येथे प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले संतोष मारुती गाडे यांचे दुर्दैवी निधन झाले होते. दोन दिवसांच्या शोधमोहिमेनंतर महसूल विभागाच्या रेस्क्यू पथकास त्यांचा मृतदेह आढळून आला.
या दुःखद घटनेनंतर शिक्षक भारती सोलापूर संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुजितकुमार काटमोरे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना निवेदन देऊन “आपत्ती बळी” म्हणून घोषित करून शासनस्तरीय मदतीची मागणी केली होती.आणि याबाबत शिक्षक भारती संघटनेचे जिल्हा प्रवक्ते विजयकुमार गुंड यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासह सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचेकडे पाठपुरावा केला.

अखेर सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर माढा तहसीलदार संजय भोसले यांनी सोमवार (ता.13) रोजी शिक्षक भारतीच्या शिष्टमंडळास चार लाख रुपयांची शासकीय मदत मंजूर झाल्याची अधिकृत माहिती दिली.यावेळी कैलासवासी संतोष गाडे यांच्या पत्नी, मुलगी, आई व मेहुणे यांच्या डोळ्यांत अश्रू दाटले होते.

दरम्यान माढा येथे तहसीलदार संजय भोसले यांच्या भेट प्रसंगी शिक्षक भारतीचे प्रवक्ते विजयकुमार गुंड, माढा तालुका अध्यक्ष संतोष आटोळे, सचिव सचिन भोंग, करमाळा तालुका उपाध्यक्ष किशोर जाधवर, सचिव सचिन गाडेकर,नागनाथ कांबळे सर, श्रीराम म्हमाणे सर तसेच देवकर सर, टोंगळे सर,हिरवे सर, बुरुटे सर, कडवे सर उपस्थित होते.
यावेळी शिक्षक भारती सोलापूरचे जिल्हा प्रवक्ता विजयकुमार गुंड यांनी कै.संतोष गाडे यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले व शासन निर्णयाबद्दल तहसीलदार संजय भोसले यांचे संघटनेच्या वतीने आभार मानले.
–
![]()