
महाराष्ट्र राज्य DIET राजपत्रित अधिकारी संघटनेची निवडणूक संपन्न;
अध्यक्षपदासाठी ऐतिहासिक निर्णय,
अरुण जाधव आणि डॉ.मंगेश घोगरे यांना प्रत्येकी 2 वर्षे अध्यक्षपद
पुणे ता.04
महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी (DIET) संघटनेची त्रैवार्षिक निवडणूक व राज्यस्तरीय अधिवेशन २ मे २०२६ रोजी नाशिक येथे उत्साहात आणि लोकशाही पद्धतीने पार पडले. या अधिवेशनात संघटनेच्या पुढील चार वर्षांच्या कालावधीसाठी नव्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीत यावेळी विशेष चुरस पाहायला मिळाली. श्री. अरुण जाधव आणि डॉ. मंगेश घोगरे या दोन्ही उमेदवारांना समान मते मिळाल्याने निवडणुकीत अनोखी परिस्थिती निर्माण झाली. यावर तोडगा काढताना सर्वसाधारण सभेने एकमताने ऐतिहासिक निर्णय घेत, दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी दोन वर्षे अध्यक्षपदाची संधी देण्याचे ठरविले. त्यामुळे चार वर्षांचा कार्यकाळ दोघांमध्ये विभागून देण्यात आला.
संघटक पदासाठी झालेल्या निवडणुकीत डॉ. राजेश गोरे (DIET, बीड) यांची बहुमताने निवड झाली. तर सरचिटणीस, कोषाध्यक्ष, राज्य उपाध्यक्ष आणि कार्यकारिणी सदस्यांसह इतर महत्त्वाची पदे बिनविरोध निवडण्यात आली. नवनिर्वाचित कार्यकारिणीने मावळत्या पदाधिकाऱ्यांकडून अधिकृतपणे पदभार स्वीकारला.
अधिवेशनाच्या निमित्ताने शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये डॉ. कमलादेवी आवटे (सहसंचालिका, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद), डॉ. योगेश सोनवणे व डॉ. सचिन चव्हाण (ओएसडी, शालेय शिक्षण मंत्री कार्यालय), तसेच डॉ. शशिकांत शिंदे (मुख्य प्रशासकीय अधिकारी, मुंबई) यांचा समावेश होता. संघटनेतून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमात मागील चार वर्षांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला तसेच आगामी काळातील शैक्षणिक आव्हानांवर सविस्तर चर्चा झाली. राज्यातील शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीसाठी ‘शिक्षण सक्षमीकरण शाखा’ अधिक प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास नवनिर्वाचित अध्यक्षांनी व्यक्त केला.
या अधिवेशनाला राज्यभरातील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) मधील राजपत्रित अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
![]()