
इंदापूर बाजार समितीत डाळिंबाला मिळाला विक्रमी भाव
501 रुपये प्रति किलो मिळाला दर
बाजार समितीच्या वतीने उत्पादक शेतकरी सत्कार
इंदापूर ता.05
इंदापूर कृषि उत्पन्न बाजार समितीत डाळिंबाला यंदा अभूतपूर्व दर मिळाला आहे. यामध्ये करमाळा तालुक्यातील शेतकरी हरिश्चंद्र साळुंखे यांच्या डाळिंबाला तब्बल प्रति किलो 501 रुपये इतका दर मिळाला. तर मोहोळ तालुक्यातील शेतकरी अनिकेत दळवी यांच्या डाळिंबाला प्रति किलो 200 रुपये भाव मिळाला. बाजार समितीच्या इतिहासातील हा सर्वाधिक दर मानला जात आहे. दरम्यान या शेतकऱ्यांचे एक डाळिंब सर्वसाधारणपणे 1000 ग्रॅम पेक्षाही अधिक होते.उच्च प्रतीचे, दर्जेदार डाळिंब पाहून व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर खरेदीसाठी मागणी केली.दरम्यान डाळिंबाला मिळालेल्या या अभूतपूर्व दरामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले.

इंदापूरसह परिसरातील माढा करमाळा माळशिरस मोहोळ या परिसरातील डाळिंब इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या डाळिंब केंद्रात विक्रीसाठी येत असते.त्यानुरूप शुक्रवार (ता.05) रोजी करमाळा तालुक्यातीलसानोली येथील शेतकरी हरिश्चंद्र साळुंखे यांनी आपल्या शेतातील भगवा जातीचे डाळिंब विक्रीसाठी आणले होते. या डाळिंबाचा दर्जेदारपणा, योग्य साईज, आणि उच्च प्रत यामुळे व्यापाऱ्यांची खरेदीसाठी झुंबड उडाली होती यामध्ये तब्बल 100 रुपयांपासून ते अंतिम 501 रुपये प्रति किलोपर्यंत त्यांच्याकडील डाळिंब प्रतवारीनुसार विकले गेले.तर याचवेळी मोहोळ तालुक्यातील यावली येथील अनिकेत दळवी यांनी आणलेल्या डाळिंबालाही 70 रुपयापासून 201 रुपयापर्यंत प्रति किलो असा भाव मिळाला.या विक्रमी खरेदीसाठी राजाभाऊ गवळी फ्रुट कंपनी यांच्या आडतीवर आघाडीचे व्यापारी अविनाश बारवकर यांनी पुढाकार घेतला.दरम्यान उत्पादकांना या विक्रमी दराने मोठा आत्मविश्वास मिळाला असून डाळिंबाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

याबाबत इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे मार्गदर्शक व माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे,सभापती तुषार जाधव, उपसभापती मनोहर ढुके, संचालक माजी आमदार यशवंत माने,विलासराव माने,दत्तात्रय फडतरे, मधुकर भरणे,रोहित मोहोळकर,संग्रामसिंह निंबाळकर,संदिप पाटील,रुपाली संतोष वाबळे,मंगल गणेशकुमार झगडे,आबा देवकाते,संतोष गायकवाड,अनिल बागल,दशरथ पोळ,रोनक बोरा,सुभाष दिवसे प्रभारी सचिव संतोष देवकर यांच्यावतीने या विक्रमी यशाचा सन्मान म्हणून बाजार समितीच्या वतीने शेतकरी हरिश्चंद्र साळुंखे आणि अनिकेत दळवी यांच्यासह आडते आणि खरेदीदार व्यापारी यांचा सत्कार करण्यात आला.

“इंदापूर बाजार समिती शेतकऱ्यांना हमखास योग्य दर मिळावा, यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. दर्जेदार उत्पादन, मागणी-पुरवठा व निर्यात वाढ यामुळे डाळिंबाच्या भावात चांगली वाढ होत आहे. भविष्यात शेतकऱ्यांना आणखी चांगला दर मिळण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील. ”आप्पासाहेब जगदाळे (मार्गदर्शक कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूर)
–
कष्टाचे चीज झाले……….डाळिंब बागेचे उत्पादन घेत असताना अनेक आलेल्या अनेक अडचणींचा सामना करून फक्त फळावर लक्ष केंद्रित न करता माती आणि झाड यावर साधलेले लक्ष यामुळे चांगले उत्पादन मिळाले असून डाळिंबाला मिळालेला उच्चांक दर यामुळे मोठा आत्मविश्वास मिळाला आहे. हरिश्चंद्र साळुंखे (डाळिंब उत्पादक शेतकरी करमाळा)
![]()