
इंदापूर शहरात मुसळधार पावसाने हाहाकार,
रस्त्यांना आले ओढ्याचे स्वरूप,
नागरीक तसेच व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली नुकसानीची पाहणी
लोकमराठी News, इंदापूर ता.27
इंदापूर शहरात शुक्रवारी रात्री उशिरा व शनिवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील रस्त्यांना अक्षरशः ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाले. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने घरे, दुकाने व गोदामांमध्ये पाणी शिरून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.दरम्यान शनिवार रोजी सकाळी नुकसानग्रस्त भागाची राज्याचे कृषीमंत्री तथा स्थानिक आमदार दत्तात्रेय भरणे यांनी पाहणी केली. यावेळी नुकसानग्रस्त कुटुंबीयांची विचारपूस करून मदत तातडीने मिळावी यासाठी प्रशासनाला सूचना केल्या.

इंदापूर शहरासह परिसरातील गावामध्ये शुक्रवारी रात्री ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस कोसळला तसेच शनिवारी पहाटेही जोरदार पाऊसाने हजेरी लावली यामुळे शनिवारी सकाळी शहरातील सर्व रस्त्यांवर पाणीच पाणी वाहत आले.यामुळे शहरातील सर्व रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप आले.शहरातील सखल भागातील दुकाने, घरे , गोदाम यामध्ये पाणी शिरले यामुळे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले.यामध्ये पानधरा नाला, इंद्रेश्वर मंदिर परिसर, सिद्धेश्वर मंदिर, प्रशासकीय भवन लगतचे व्यापारी संकुल,ज्येष्ठ नागरिक संघ लगतचा परिसर, बाब्रस मळा, जुना पुणे सोलापूर मार्ग, बस स्थानक परिसरासह अन्य भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

या नुकसानग्रस्त भागाची शनिवार सकाळी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी पाहणी करीत उपायोजना करण्याबाबत सूचना केल्या.यावेळी माजी उपनगराध्यक्ष भरत शहा, अशोक इजगुडे, प्रा.कृष्णा ताटे, यांचेसह स्थानिक भागातील नागरिक यांनी व्यथा मांडल्या.तर मुख्याधिकारी रमेश ढगे यांनी परिस्थितीची माहिती दिली.
दरम्यान, शहरात झालेल्या या परिस्थितीला पावसाचे वाढलेले प्रमाण व नागरिकांनी केलेले अतिक्रमणे कारणीभूत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला.
तर नगरपरिषद प्रशासनाने पहाटेपासूनच पाणी काढण्यासाठी तातडीने यंत्रणा कामाला लावली असली तरी पावसाच्या प्रचंड जोरामुळे कर्मचाऱ्यांनाही अडचणींना सामोरे जावे लागले.

–
नगरपरिषदेचे आवाहन
इंदापूर नगरपरिषदेच्या वतीने नागरिकांना सावधानतेचे आवाहन करण्यात आले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असल्याने खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये विजेच्या खांबाजवळ अथवा विद्युत तारांजवळ जाणे टाळावे.वाहत्या पाण्यात किंवा साठलेल्या पाण्यात जाण्याचा धोका पत्करू नये.लहान मुलांना घराबाहेर जाऊ देऊ नये.पूरस्थिती निर्माण झाल्यास आवश्यक साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे.काही अडचण आल्यास तात्काळ नगरपरिषदेशी संपर्क साधावा.असे आवाहन मुख्याधिकारी रमेश ढगे यांनी केले.
–
![]()