
पिंपरीत राष्ट्रवादीच्या जनसंवादात १,८०० तक्रारी तत्काळ निकाली
अजितदादांच्या नेतृत्वाखालील दुसऱ्या जनसंवादात ४,८०० तक्रारींची नोंद
पिंपरी जनसंवादात पाणीपुरवठा, स्वच्छता व वाहतूक यांवर नागरिकांचा भर
लोकमराठी News, इंदापूर ता.20
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पिंपरी येथे आज जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हडपसरमधील यशस्वी जनसंवादानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पिंपरीत दुसऱ्या जनसंवादाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
हडपसरप्रमाणेच पिंपरी येथील जनसंवादातही नागरिक, विविध शासकीय विभाग आणि लोकप्रतिनिधी एकत्र आले. या उपक्रमासाठी डिजिटल हेल्पलाईन, व्हॉट्सअॅप चॅटबॉट्स, डिजिटल किऑस्कसारखे आधुनिक तंत्रज्ञान वापरात आणले गेले, ज्यामुळे पारदर्शकता आणि उत्तरदायित्त्व निश्चित झाले.

यावेळी २५ पेक्षा जास्त शासकीय विभागांनी सहभाग घेतला. एकूण ४,८०० तक्रारींची नोंद झाली असून त्यापैकी सुमारे १,८०० तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्यात आले. बहुतांश तक्रारी पाणीपुरवठा, स्वच्छता आणि वाहतूक यांच्याशी संबंधित होत्या. अजितदादा पवार यांनी स्वतः संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवत तक्रार निवारणासाठी संबंधित विभागांना तात्काळ मार्गदर्शन केले.
जनसंवाद हा आता अजित पवारांचा नागरिकांशी संवाद साधण्याचा एक सुसंघटित पॅटर्न बनत आहे. वैयक्तिक संवाद आणि डिजिटल साधने यांचा संगम घडवून आणणारा हा उपक्रम लोक आणि त्यांच्या प्रतिनिधींमधील विश्वास अधिक दृढ करत असून समस्यांचे पारदर्शक व जबाबदारीपूर्वक निराकरण यामुळे होत आहे.
पिंपरीनंतर लवकरच राज्यातील इतर भागांतही हा जनसंवाद सुरू राहणार असून लोकांचे नागरी सेवेशी निगडित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि सुलभ शासन देण्यासाठी हा सातत्यपूर्ण उपक्रम राबवला जाणार आहे.
–

“तक्रारी मंत्रालय व संबंधित खात्यांपर्यंत पोहोचवू”
आज पिंपरीकरांनी मांडलेल्या प्रत्येक तक्रारी काळजीपूर्वक ऐकल्या. स्थानिक प्रशासनाच्या उपस्थितीत अनेक अडचणी त्वरित सोडवल्या. उर्वरित तक्रारी मंत्रालय, संबंधित मंत्रालये व विभागांपर्यंत पोहोचवण्यात येतील. प्रत्येक प्रकरणाचा फॉलो-अप करून त्याचे समाधान मिळेल याची खात्री आम्ही करून घेणार आहोत.”
अजित पवार (उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य)
![]()